सायकलचे बटन दाबल्यावर येते कमळाची चिठ्ठी; सपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाबाबत समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगकडे तक्रार दाखल केली आहे. अनेक बूथवर सायकलचे बटन दाबल्यावर कमळाची चिठ्ठी येत होती, अशी तक्रार सपाकडून करण्यात आली आहे. मुरादाबादमधील एका मतदाराचा याबाबतचा व्हिडिओ शअर करत निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी सपाने केली आहे.

मुरादाबाद ग्रामीण विधानसभा 27, बूथ संख्या 417 याठिकाणी सायकलचे चिन्ह दाबल्यावर कमळाला मदतान केल्याची चिठ्ठी येत आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे. तसेच निष्पक्ष पारदर्शी आणि भयमुक्त वातावरणात निवडणूका पार पडण्याची काळजी घ्यावी, असे सपाने म्हटले आहे.

रामपूरमध्ये बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न झाल्याचा आरोपही सपाने केला आहे. रामपूर विधानसभा 37 बुझ क्रमांक 289,311 हे बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न झाल्याचे सपाने म्हटले आहे. समाजवादी पक्षाकडे अनेक मतदारांकडून तक्रारी येत असल्याचेही पक्षाने म्हटले आहे. त्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करावेत, यासाठी निवडणूक आयोगाकडेही या तक्रारी पाठवण्यात आल्या आहेत.

सहारनपूरमध्ये बोगस मतदान झाल्याचाही आरोप सपाने केला आहे. तसेच बुरखा घालून काही महिलांनी बोगस मतदान केल्याचा संशय भाजपने व्यक्त केला आहे. बुरखा घातलेल्या महिलांची ओळख पटवून मतदान करण्यात येण्याची मागणीही भाजपने केली आहे. बुरखाच्या आडून बोगस मतदान होत असल्याची शक्यता भाजपच्या एका उमेदवाराने व्यक्त केली आहे.