बंगालला हाथरस किंवा उन्नाव बनू देणार नाही, ममता बॅनर्जींनी भाजपला सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलकाता येथे बोलतना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपशासित राज्यांना लक्ष्य केले आहे. प. बंगालमध्ये लोकशाही असल्याने इथे ज्यादा तक्रारी नोंदवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हांसखालीच्या घटनेवरून वादळ उठले असताना ममता बॅनर्जी यांनी राणाघाट जिल्हा पोलिसांशी व्हर्च्युअल संवाद साधला. या बैठकीवेळी त्यांनी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले.

हांसखालीची घटना कशी घडली? IC ने योग्य खबर का ठेवली नाही, ICच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. तुमच्या जिल्ह्यात किती लोकांचा मृत्यू झाला याची माहिती ठेवावी लागेल. पंचायत प्रमाणपत्र देते आणि आम्हाला माहित देखील नाही, अशा शब्दात त्यांनी निराशा जाहीर केली.

आत्महत्येला बलात्काराचा गुन्हा ठरवण्यात आला. भाजप आणि सीपीएम हे दोघे मिळून बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही बंगालला हाथरस किंवा उन्नाव बनू देणार नाही, असेही ममता यावेळी म्हणाल्या.

एएनआयने ममता बॅनर्जींचे विधान ट्विट केले आहे. ‘कोणतीही घटना घडली की त्याचा तपास करावा लागतो. घटना काय आहे, हे तपासाच्या आधारे ठरवले जाते. बंगालमध्ये लोकशाही आहे त्यामुळे अधिक तक्रारी नोंदवल्या जातात परंतु उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशात तक्रारींना परवानगी नाही’, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

‘येथे कोणतीही घटना घडली आणि ती खरी असेल तर त्यावर कारवाई केली जाते. मी कायद्याचा अभ्यास केला आहे, मलाही कायदा माहीत आहे’, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी लगावला.