
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेची तत्काळ उत्तरपत्रिका जाहीर करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
यूपीएससी परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर पूर्वपरीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर होत होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. यात ही माहिती देण्यात आली आहे. पूर्वपरीक्षेची तात्पुरती उत्तरपत्रिका जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
हरकती मागवणार
याबाबत हरकती व सूचना मागवल्या जातील. सर्व बाजूंचा सखोल विचार केला करून उत्तरपत्रिकेचे स्वरूप ठरवले जाईल. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम उत्तरपत्रिका प्रकाशित केली जाईल, असेही आयोगाने नमूद केले आहे.
काय आहे प्रकरण
नागरी सेवा पूर्वपरीक्षेचे गुण, कट ऑफ गुण आणि उत्तरपत्रिका ही संपूर्ण परीक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रकाशित करण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. याने अपयशी उमेदवारांना योग्य व प्रभावी उपाय शोधण्याची संधी मिळत नाही. उत्तरपत्रिका लगेच जाहीर केल्यास उमेदवारांना चुकीच्या मूल्यमापनावर तत्काळ आक्षेप घेता येईल. तसेच पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पारदर्शक होईल, असा दावा करत न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.



























































