मैदान नसलेले गाव, त्याचे उरण असे नाव! एकमेव मैदानावर वाहन पार्किंग, गर्दुल्ल्यांचा अड्डा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण तालुक्यात खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान नसल्याने ‘मैदान नसलेले गाव, त्याचे उरण असे नाव’ असे म्हणण्याची वेळ उरणकरांवर आली आहे. शहरात असलेले एकमेव मैदान वाहन पार्किंग आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. जिल्हा क्रीडा विभागाने सिडकोकडे मैदानाची मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याचा फटका अनेक होतकरू खेळाडूंना बसत आहे.

उरण शहर चार चौरस किलोमीटर क्षेत्रावर वसलेले आहे. नगर परिषदेच्या क्षेत्रात एकमेव वीर सावरकर मैदान आहे. उरण नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे या मैदानावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील समाजसेवक, दानशूर व्यक्तींनी नगर परिषदेला खेळाच्या मैदानासाठी जागा दिली होती. गेल्या २५-३० वर्षांपासून या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे मैदान वाहन पार्किंग, गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे.

जीव धोक्यात

शहरात विमला तलावातील बालोद्यान, भवरा येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, मोरा येथील लालबहादूर शास्त्री बालोद्यान, बोरीतील गार्डन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, तुंगेकर उद्यान आदी मुलांसाठी उद्याने आहेत. या सर्व उद्यानांमधील खेळण्यांची मोडतोड झालेली आहे. नादुरुस्त, तुटक्या खेळण्यांमुळे लहान मुलांना आपला जीव धोक्यात घालून खेळावे लागत आहे. शालेय सुटीत लहान मुलांनी खेळायचे तरी कुठे, असा संतप्त सवाल पालक विनायक पाटील यांनी विचारला आहे.

“शहरातील दुरवस्था झालेल्या उद्यान, बालोद्यानांची तातडीने दुरुस्ती केली जाईल. सध्या दुरवस्थेत असलेल्या शहरातील वीर सावरकर मैदानाच्या विकासासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत सभागृहात सदस्य, प्रशासन एकत्रितपणे येऊन प्रश्न निकाली काढतील.” — निखिल दोरे, नगररचनाकार