उरणच्या द्रोणागिरी डोंगरावर ट्रेकिंगला गेलेल्यांवर मधमाश्यांचा हल्ला, तिघांची 6 तासांनंतर सुटका

उरणच्या द्रोणागिरी डोंगरात ट्रॅकिंगसाठी गेलेल्यांवर मधमाश्यांची हल्ला केला. यामुळे ट्रेकर्स 800 फुट खोल दरीत बेशुद्ध अवस्थेत अडकून पडले होते. या ट्रेकर्सना उरणच्या नवपरिवर्तन ग्रुपचे सदस्य व डॉक्टरांनी सहा तासांच्या अथक परिश्रमाने दरीतून शिताफीने बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.

उरण तालुक्यातील नवघर आणि डाऊर नगरमधील तीन ट्रॅकर्सं द्रोणागिरी डोंगरात ट्रॅकिंगसाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता निघालेल्या
या ट्रॅकर्संवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. मधमाश्यांच्या हल्ल्याने घाबरगुंडी उडालेले ट्रेकर्स वाट सापडेल तिकडे धावत सुटले. मधमाश्यांपासून सुटका करून घेण्यासाठी सैरावैरा धावत सुटलेले ट्रॅकर्स द्रोणागिरी डोंगराच्या पश्चिमेकडे असलेल्या 800 फुट खोल दरीत उतरले. मात्र मधमाश्यांच्या चाव्यांमुळे बेजार झालेल्या गणेश तांडेल याने जखमी अवस्थेतही परिचित असलेल्या नवपरिवर्तन ग्रुपचे डॉ. सत्या ठाकरे यांना मोबाईलवरून संपर्क साधला. अडकुन पडलेल्या जागेची इत्यंभूत माहितीही मोबाईलवरुन शेअर केली.

यानंतर नवपरिवर्तन ग्रुपचे डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घनश्याम पाटील, विरेश मोरखडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी द्रोणागिरी डोंगर गाठले. मोबाईलवर शेअर केलेल्या माहितीवरून आणि अडकून पडलेल्या दरीतील जागा शोधून काढली. डोंगर परिसर ओएनजीसीच्या अखत्यारीत येत असल्याने सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सीआयएसएफ जवानांना हकिगत सांगितली. सीआयएसएफ जवानाही संकट समयी मदतीला धावून आले.

द्रोणागिरी डोंगराच्या 800 खोल दरीत अर्ध्यावर जखमी अवस्थेत अडकुन पडलेल्या ट्रेकर्सची सुटका करण्याची मोहीम सुरु झाली. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना ट्रेकर्सपर्यंत पोहचण्यात यश मिळाले. घटनास्थळी तिघेही ट्रेकर्संजवळपास अर्धवट बेशुद्ध अवस्थेत निपचित पडून होते. मधमाश्यांनी डंख मारल्याने जखमा झाल्या होत्या. सुज चढली होती. अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असलेल्यांना डॉक्टर सत्या ठाकरे आणि डॉ.घनश्याम पाटील यांनी प्रथमोपचार केले.सलाईन लाऊन शुध्दीवर आणले.त्यानंतर त्यांना घरंगळत्या दरीतून वर आणले. त्यानंतर दोघांना उपचारासाठी उरण शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सत्या ठाकरे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या