
सामना प्रतिनिधी। उरण
जेएनपीटी बंदराच्या परिसरातील रासायनिक टँकफार्म अंतर्गत असलेल्या गटारात सांडलेल्या रासायनिक द्रव पदार्थाला सोमवारी मोठी आग लागली. गटारातील सांडपाण्यात ज्वलनशील पदार्थ,टायर,कपडे असल्याने आगीचे लोळ मोठ्या उंचीवर पोहचले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग तात्काळ आटोक्यात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा उरणचा भोपाळ होण्यास वेळ लागला नसता अशी भिती येथील कामगार वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
जेएनपीटी बंदराच्या परिसरातील ५०० हेक्टर क्षेत्रात रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या रासायनिक प्रकल्पात रिलायन्स, सुरज अग्रो , इंडियन आँईल, विराज, आय.एम.सी, जीबीएस आदि रासायनिक कंपनीचा समावेश आहे. या कंपन्यात मोठ्या प्रमाणात तेल, ज्वलनशील रासायनिक द्रव पदार्थाची साठवणूक केली जात आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत टपरीधारक, टायरधारक इतर व्यवसायिक तसेच अनाधिकृत पार्किगचे व्यवसायिक आपले बस्तान मांडून बसले आहेत.त्यात सोमवारी रिलायन्स कंपनीच्या जवळच असलेल्या गटारातील सांडपाण्यात मिसळलेल्या रासायनिक द्रव पदार्थालाच अचानक आग लागण्याची घटना घडली.
गटारातील सांडपाण्यात मिसळलेल्या रासायनिक द्रव पदार्थ ,टायर,कापड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या भीषणतेमुळे आग आणि काळ्या धुराचे लोळ थेट गगणाला जाऊन भिडले. यामुळे सगळीकडे एकच हाहाकार उडाला होता. या घटनेची माहिती न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांना मिळताच त्यांनी जेएनपीटी, सिडकोच्या अग्निशमक दलाच्या जवानांना पाचारण केले.
जेएनपीटी, सिडकोच्या चार अग्निशमन बंबाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग तात्काळ आटोक्यात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
त्याशिवाय गटारात साचून राहिलेल्या सांडपाण्यामुळे आगी सारख्या भीषण घडतात. याआधीच जेएनपीटीच्या रासायनिक प्रकल्पाला भीषण आग लागली किंवा भीषण स्फोट झाल्यास जेएनपीटी परिसरातील रासायनिक प्रकल्पाच्या सभोवताली असलेला ३० किमी परिसर बेचिराख होण्यांचा धोका तज्ञांनी वर्तविला आहे. मात्र या धोक्याची गंभीरता ना येथील रासायनिक प्रकल्पांना ना येथील जेएनपीटीला असल्याचे दिसून येत नाही. त्यातच महाराष्ट्र प्रदूषणनियंत्रण मंडळाचे अधिकारी रासायनिक कंपन्यांबरोबर असलेल्या आथिर्क साटेलोटयांमुळे अशा या घटनांना एक प्रकारे खतपाणीच घालीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. आगीच्या वाढत्या घटनामुळे उरणचा भोपाळ तर होणार नाही ना याची प्रशासनाने गंभीरपणे दखल घेण्यांचाही मागणी होऊ लागली आहे. दरम्यान या प्रकरणी न्हावा शेवा पोलीस अधिक तपास करीत असून या तपासातच आगीचे नेमके कारण कळू शकेल अशी माहिती व.पो.नि.चेतन काकडे यांनी दिली.































































