उरणच्या सव्वापाच वर्षीय मुलीची एकाच दिवशी पाच गडांवर यशस्वी चढाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण येथील सव्वापाच वर्षांची मुलगी हर्षिती भोईर हिने लोणावळ्यानजीक असलेले पाच किल्ले एका दिवसात तेही अवघ्या 11 तास 39 मिनिटांत सर करण्याची अनोखी करामत केली आहे. रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या हर्षितीच्या या अजोड आणि कौतुकास्पद कामगिरीचे उरण परिसरातच नव्हे राज्यभरातील ट्रेकर्स, क्रीडाप्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील सव्वा पाच वर्षीय चिमुरडी हर्षिती भोईर हिला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे. या आवडीतूनच तिने गड, किल्ले सर करण्याचा सपाटा लावला आहे. याआधीच्या अनुभवाच्या जोरावर तिने रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तिने लोणावळानजीक असलेले श्रीवर्धन गड, मनोरंजन गड, लोहगड, विसापूर, तिकोना हे पाच गड एका दिवसात सर करण्याचा निर्धार केला होता. रविवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आई -वडिलांसोबत श्रीवर्धन गडापासून सुरुवात करून सायंकाळपर्यंत पाचही गड चढून मोठ्या शिताफीने
पार केले. तेही अवघ्या 11 तास 39 मिनिटांत.

याआधीही तिने 8 जून 2019 रोजी महाराष्ट्रातील कळसूबाई हे सर्वात उंच शिखर वयाच्या अवघ्या साडेचार वर्षाची असताना फक्त 3 तास आणि 35 मिनिटात सर करून आपल्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली असल्याची माहिती हर्षिती वडील कविराज भोईर यांनी दिली. तसेच तिने आत्तापर्यंत रायगड, कर्नाळा, श्रीवर्धन गड, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, शिवनेरी, लोहगड, विसापूर, तिकोना गड, तुंग (कठीण गड), मोरगिरी किल्ला, कोरी गड, आशेरी गड आदी 13 किल्ले सर केले असल्याची माहितीही कविराज भोईर यांनी दिली.

या अनुभवाच्या जोरावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच लोणावळ्यानजीक असलेले श्रीवर्धन गड, मनोरंजन गड, लोहगड, विसापूर, तिकोना हे गड दिवसभरात सर करण्याचा निश्चय हर्षितीने केला होता. तो तिने अवघ्या 11 तास 39 मिनिटांत पुर्णत्वास नेला, असे कविराज यांनी सांगितले. हर्षितीच्या या अनोख्या अशा ट्रेकची नोंद वर्ल्ड बुक, आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. रविवारी हा ट्रेक यशस्वी झाल्याने हर्षितीची सर्वात लहान ट्रेकर अशीही नोंद होईल असा विश्वासही कविराज यांनी व्यक्त केला.