
गव्हाणफाटा-चिरनेर मालगाडी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड पुलाचे बांधकाम मागील तीन वर्षभरापासून लटकले आहे. याबाबत परिसरातील गावकऱ्यांनी अनेकदा आवाज उठवूनदेखील प्रशासन कानाडोळा करत असून हे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे जवळपास पाच हजार प्रवासी वाहनांना दोन किमी अंतरापर्यंत वळसा घालून चिर्ले मार्गाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे उरणकरांना अक्षरशः ‘हेडॅक’ झाला आहे.
जेएनपीए बंदरातून कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या गव्हाणफाटा-चिरनेर दरम्यानचा धोकादायक ओव्हरहेड पूल पाडण्यात आला आहे. पाडण्यात आलेल्या या ओव्हरहेड पुलाच्या जागी नवीन पूल बांधला जात आहे. मात्र हे काम मागील तीन वर्षांपासून रखडत सुरू आहे. पनवेल, मुंबई, नवी मुंबई व ठाण्यासह इतर मार्गाकडे जाणारा व उरण पूर्व विभागाशी जोडणारा गव्हाणफाटा-चिरनेर रस्त्यावरून दररोज पाच हजारांहून अधिक वाहने ये-जा करतात. मात्र पुलाचे काम लटकल्याने उरणकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसटी सेवाही बंद झाली
सध्या हा मार्ग बंद असल्याने वाहनचालक सुमारे दीड किलोमीटरचा वळसा घालून चिर्ले मार्गावरून प्रवास करत आहेत, तर चिरनेर मार्गावरून येणाऱ्या वाहनांना पनवेलकडून येणाऱ्या महामार्गाच्या उलट दिशेने वळसा घेऊन गव्हाणफाटा मार्ग गाठावा लागत आहे. उरण तालुक्यातील जांभूळपाडा, वेश्वी, दिघोडे या गावांची एसटी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खासगी वाहनाने जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे

























































