
राजकुमार भगत । न्हावाशेवा
पावसाळ्यात उरण तहसिल कार्यालयाला गळती लागल्याने कुळ वहिवाट कार्यालयातील शेती संबंधीत महत्वाची कागद पत्रके,पुरवाठा व इतर कार्यालयातील शासकीय दप्तर भिजण्याचा धोका निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांनी तात्पूरता उपाय म्हणून कार्यालयाच्या आतून ताडपत्री बांधली असली तरी किती वेळ गळती थांबवणार असा प्रश्न नागरीकांकडून विचारण्यात येत आहे.
उरण तहसिल कार्यालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. मागील वर्षी याबाबत खूप टिका झाल्यानंतरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसिल कार्यालयातील तहसिलदार आणि नायब तहसीलदार अधिकारी बसत असलेल्या दालनाच्या वरील छतावर नव्याने पत्र्याचे छेड उभारण्याचे काम हाती घेतले. मात्र शेतकऱ्यांची, नागरीकांची महत्त्वाची कागद पत्रके असलेल्या कुळ वहिवाट, पुरवठा विभाग तसेच इतर ठिकाणा वरील छताला लागलेल्या गळतीवर उपाय योजना करण्याच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने आज यावर्षीच्या पावसाळ्यात या कार्यालयातील छता मधून पावसाचे पाणी झिरपू लागले आहे. छतातून गळत असणारे पाणी थांबविण्यासाठी उपाय योजना म्हणून या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी,कर्मचाऱ्यानी चक्क प्लास्टिकची ताडपत्री आपल्या दालनाच्या छताला बांधून तात्पूरती उपाय योजना केली आहे.
यासंदर्भात या कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, तहसिल कार्यालयातील छताला गळती लागली आहे हे खरे आहे .तरी या कार्यालयातील महत्त्वाची शेती संबंधीत कागद पत्रके व इतर शासकीय कागद पत्रके पावसाच्या पाण्यात भिजणार नाहीत याची खबरदारी म्हणून गळती लागलेल्या छता जवळ ताडपत्री बांधली आहे.































































