उरण शहरात बेकायदा वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

426

उरण शहरात बेकायदेशीर वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून शनिवारी सुमारे 50 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उरण शहर आणि परिसरात झपाट्याने वाढलेले नागरीकरण आणि त्या अनुषंघाने अतिशय छोट्या असलेल्या उरण बाजारपेठेत नागरिकांनीही नियमित गर्दी होत असते.वाहनांमध्येही प्रचंड प्रमाणात वाढ होत असून,बाजारपेठेच्या निमित्ताने शहरात अनेक वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे या वाहनांच्या कोंडीचा त्रास येथील नागरिकांना सोसावा लागत आहे.

त्यामुळे उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (7) उरण शहरात बेकायदेशीर वाहन चालकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यावेळी मोटार सायकलवरील ट्रिपल सीट, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे,विना वाहन चालक परवाना वाहन चालविणे, वाहनाच्या नंबर प्लेटवर गाडी क्रमांका ऐवजी ठळक अक्षरात बटलर, झिरो किंवा अन्य चित्र विचित्र नावे,त्याच प्रमाणे शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी विनापरवाना वाहन चालविणे अशा प्रकारच्या वाहनांवर उरण शहरात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरातील पालवी हॉस्पिटल समोरील नाक्यावर उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या आधिपत्याखाली पोलिस हवालदार डी. आर.भोई,एम.आर.ठाकूर,एम.पी.पवार आणि सुरक्षारक्षक कर्मचारी यांनी अवघ्या अर्ध्या तासात 50 हुन अधिक बेकायदेशीर वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या