
राजकुमार भगत
संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा होणाऱ्या गणपतीची भक्तगण आतुरतेने वाट पहात असताना उरण तालुक्यात मात्र बेसुमार वाहतूक कोंडीमुळे बाप्पांच्या आगमनात विघ्न निर्माण झाले आहे. दरवर्षी खराब रस्त्यांमुळे बाप्पांच्या आगमनात विघ्न येत असे पण यावर्षी रस्ते चांगले असून नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथिल नागरीक मेटाकुटीस आले आहेत. चिरनेर गव्हाणफाटा मार्ग, उरण-बेलापूर आम्र मार्ग आणि गव्हाणफाटा-पनवेल मार्ग या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना तासंतास या वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. गणपती बाप्पांना देखिल या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पेणवरून मुंबई, ठाणेकडे जाणाऱ्या बाप्पांच्या मुर्तींच्या गाड्या या वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत.
गणेशोत्सव दोन दिवसांवर येवून ठेपला असताना नागरीकांची खरेदीसाठी धामधुम सूरू झाली आहे. उरणच्या नागरिकांना पनवेल, वाशी किंवा मुंबई येथे सामान खरेदीसाठी जावे लागते. मात्र या येथे जाण्यासाठी असणाऱ्या मार्गावर रोज प्रचंड वाहतूक कोंडी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रेलरच्या रांगा आणि त्यातून मार्ग काढताना एखादे अवजड वाहन बंद पडल्यास रस्ता बंद होतो आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक आणि सामाजिक संस्था करत असताना मात्र वाहतूक पोलिस याकडे जाणून बूजून दुर्लक्ष करतात. गणपती निमित्त तरी या मार्गांवर अवजड वाहतूकीला दिवसा बंदी करावी अशी मागणी येथिल नागरिक करत आहेत.
शुक्रवारी ता.30 पहाटेच्या सुमारास या तिनही मार्गांवर 10 ते 12 अवजड वाहने आणि दोन बस बंद पडल्या होत्या. त्या हटवण्यासाठी पोलिसांकडे टोईंग व्हॅन नसल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. एक एक वाहन 4-5 तास एकाच जागेवर अडकून पडले होते. सकाळी खरेदीसाठी निघालेले नागरीक या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले होते. यामध्ये अनेक गणपतीच्या मुर्तीं वाहून नेणारी वाहने देखिल अडकली होती. या मार्गांवरून पेण-हमरापूर येथे तयार झालेले गणपतीच्या मुर्ती मुंबई, ठाणे येथे पाठविले जातात. रोज अनेक वाहने चिरनेर-गव्हाणफाटा मार्गावरून मुंबई, ठाणेकडे गणपती वाहून नेतात. मात्र वाहतूक कोंडीत ही वाहने अडकून पडल्याने त्यांचा कित्येक तास खोळंबा झाला.
या बाबत उरण वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक माणिक नलावडे यांना विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. चिरनेर गव्हाणफाटा मार्गावर दिघोडे येथे, गव्हाणफाटा पनवेल मार्गावर पाडघर येथे तर उरण बेलापूर मार्गावर जासई आणि वहाळ येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. गणपती सणात तरी या मार्गावर वाहतूक कोंडी होवू नये यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
































































