
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी ‘यूआरएल फाऊंडेशन’चा रौप्य महोत्सवी भव्य पुरस्कार वितरण आणि ‘कृतज्ञता दिवस’ सोहळा शुक्रवारी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात उत्साहात संपन्न झाला. यूआरएल फाऊंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार शिक्षणतज्ज्ञ वारे गुरुजी आणि वनस्पती तज्ज्ञ शांताराम कोकरे यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यूआरएल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उदय यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती लाभली. अभिनेते सुमित राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात साहित्य गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘अश्वत्थामा’ या नाटकातील एक प्रवेश सादर केला. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समिती (सातारा) यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी सुपूर्द करण्यात आला.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेंद्र पै, बिना पै, डॉ. शैलेश श्रीखंडे, रवींद्र आवटी, अजित भुरे आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी हास्य-धारा कविसंमेलन रंगले. कवी अशोक नायगावकर, महेश केळुसकर, कवयित्री यामिनी दळवी आणि गुंजन पाटील यांनी आपल्या बहारदार, मार्मिक आणि खुसखुशीत कविता सादर करून हास्याचे कारंजे उडवले. या कार्यक्रमाचे नियोजन सरचिटणीस शिवकुमार लाड, खजिनदार सुधारिका लाड यांनी केले.


























































