हुतात्म्यांना आदरांजली वाहत साडेआठ वर्षांच्या उर्वीने गड जिंकला! इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद

महाराष्ट्र म्हटलं की 105 हुतात्म्यांच बलिदान डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या या बलिदानामुळेच 1 मे रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अर्नाळा गावातील उर्वी निनाद पाटील या चिमुकलीने अर्नाळा जेट्टी ते अर्नाळा जलदुर्गापर्यंत पोहून जात 105 हुतात्म्यांना आगळीवेगेळी आदरांजली वाहिली होती. तिच्या या धाडसाची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

उर्वी निनाद पाटील ही साडेआठ वर्षांची असून आगाशी येथील जॉन 23 शाळेमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. उर्वीचे वडील निनाद पाटील हे मुंबई पोलीस दलात विशेष सुरक्षा शखा येथे कार्यरत आहेत. तसेच ते पट्टीचे पोहणारे असून त्यांनी तब्बल 230 वेळा अर्नाळा जेट्टी ते अर्नाळा जलदुर्ग हे जवळपास पावणे दोन किलोमिटरचे अंतर पोहून पार केले आहे. एक आगळावेगळा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. वडीलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत उर्वीने त्यांच्याकडूनच पोहण्याचे धडे घेतले. विरारच्या क्लब वन येथे जलतरण तलावात जावेद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ती पोहण्याचा सराव करत आहे. घराच्या मागे समुद्र असल्यामुळे वडीलांसारखे पोहून अर्नाळा जलदुर्गापर्यंत जाण्याचा तिने निश्चय केला होता. 1 मे रोजी सकाळी 11 वाजून 45 मीनिटांनी अर्नाळा जेट्टी येथून तिने समुद्रात सुर मारला. विरुद्ध दिशेने वाहणारा पाण्याचा प्रवाह, लाटांचा तडाखा आणि जोरदार वारा यांचा सामना करत उर्वीने 39 मीनिटे 40 सेकंदात अर्नाळा जलदुर्ग किनारा गाठला होता. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात उर्वीने हे यश प्राप्त केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

योग्य सराव, आई-वडीलांचा पाठिंबा, मेहनत आणि स्वत:वर असलेल्या विश्वासामुळे उर्वीने कमी वयात मोठा पराक्रम केला आहे. आजपर्यंत कोणत्याही महिला जलतरणपटूने अर्नाळा जेट्टी ते अर्नाळा जलदुर्ग समुद्रात पोहण्याचे धाडस केलेल नाही. त्यामुळेच उर्वीने केलेल्या पराक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिनटणीस विजय पाटील यांनी उर्वीच्या पराक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. उर्वीने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.