
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील हिंदुस्थानी दूतावासाने कामानिमित्त, पर्यटनानिमित्त किंवा अन्य कोणत्याही कारणाने हिंदुस्थानात आलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. अमेरिकेने नागरिकांना प्रभावित भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले.
अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे की, ‘अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्ही प्रभावित भागातील (अहमदाबाद) अमेरिकन नागरिकांना बातम्यांवर लक्ष ठेवण्याचे, स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आपत्कालीन सूचनांचे पालन करण्याचे, महत्त्वाची आपत्कालीन माहिती मिळवण्यासाठी step.state.gov, स्मार्ट ट्रॅव्हलरवर नोंदणी करण्यास व इतर अतिरिक्त अपडेट्ससाठी अमेरिकेच्या पर्यटन विभागाच्या, परराष्ट्र विभागाच्या सोशल मीडिया हँडल्सवरून माहिती घेण्याचा सल्ला देत आहोत’.
अमेरिकन दूतावासाने म्हटले की, ‘जे नागरिक प्रभावित भागात आहेत, सुरक्षित आहेत त्यांना आमच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करत आहोत. तुम्ही जर प्रभावित भागात असाल आणि तुम्हाला तत्काळ आपत्कालीन सेवेची आवश्यकता असेल तर कृपया स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. परदेशात असलेल्या अमेरिकन नागरिकांची सुरक्षितता ही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. वेगवेगळे अलर्ट, भारतातील दूतावास व वाणिज्य दूतावासाच्या संकेतस्थळाद्वारे अमेरिकन नागरिकांना आम्ही माहिती देत राहू’.