व्यापारयुद्ध संपणार; अमेरिका-चीनमध्ये करार

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेले व्यापारयुद्ध संपण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही देशांमध्ये 90 दिवसांचा व्यापार करार झाला आहे. यादरम्यान दोन्ही देश व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने विविध मुद्दय़ांवर चर्चा करणार असून सर्व वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे झालेल्या दोन दिवसांच्या व्यापार चर्चेनंतर अमेरिका आणि चीनमध्ये प्राथमिक करार झाल्याची माहिती आहे. दोन्ही देशांनी विस्तृत आणि सकारात्मक चर्चा केली, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट म्हणाले. बैठकीनंतर एक करार केला. त्यामुळे अमेरिका आपली व्यापार तूट कमी करू शकेल, परंतु त्यांनी कराराबाबत अधिक माहिती दिली नाही. चर्चेप्रसंगी अमेरिकेच्या शिष्टमंडळात स्कॉट बेसेंट, व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीर आणि उपपंतप्रधान तसेच दोन उपमंत्री यांच्यासह वरिष्ठ चिनी अधिकारी होते. दोन्ही देशांमध्ये पूर्वीप्रमाणे व्यापक मतभेद नसतील. चिनी भागीदारांसोबत आम्ही केलेला करार आम्हाला राष्ट्रीय आर्थिक आणीबाणीचे निराकरण करण्यासाठी फायद्याचा ठरेल असे जेमिसन ग्रीर यांनी म्हटले आहे.