होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी अमेरिकेकडे जगाला पुरेल इतके तेल; डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी अद्याप दोन्ही देशांचे नेते समोरासमोर बसलेले नाहीत. चर्चेत अनेक तांत्रिक आणि राजकीय अडथळे निर्माण झाले असून इराणने कडक अटी घातल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी अमेरिकेकडे जगाला पुरेल इतका आणि उच्च दर्जाचा तेलाचा साठा असल्याचे सांगत मोठा दावा केला आहे.

ट्रुथ सोशल एक पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “जगातील अनेक मोठमोठी रिकामी तेलवाहू जहाजे सध्या अमेरिकेच्या दिशेने येत आहेत. ती अमेरिकेतून तेल भरून नेतील. अमेरिकेकडे जगातील दोन मोठ्या तेल अर्थव्यवस्थांपेक्षाही जास्त आणि उत्तम दर्जाचे तेल आहे. जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवून तेलाचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तरी जगाकडे अमेरिकेच्या रूपाने तेलाचा भक्कम पर्याय उपलब्ध आहे.”

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि जेरेड कुशनर इस्लामाबादमध्ये पोहोचून चार तासांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्यांची इराणच्या कोणत्याही नेत्याशी थेट भेट झालेली नाही. दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकाच शहरात असूनही थेट संवाद साधत नसल्याने पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तानी अधिकारी दोन्ही गटांच्या भेटी घेऊन संदेशांची देवाणघेवाण करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जे.डी. व्हान्स यांची भेट घेतली असून अमेरिका, इराण आणि पाकिस्तान या तिन्ही देशांनी एकत्रित बसून चर्चा करावी, असा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र यासाठीही इराणने अटी लादल्या आहेत.

इराणने चर्चेच्या टेबलावर बसण्यासाठी इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले थांबवून तिथे युद्धविराम करावा, अशी मुख्य अट ठेवली आहे. तसेच, कतार आणि इतर देशांतील बँकांमध्ये अडकलेला इराणचा पैसा अमेरिकेने तातडीने मुक्त करावा, अशी मागणी पंतप्रधान शरीफ यांच्यामार्फत अमेरिकेकडे पाठवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त होर्मुझची खाडी, युद्धाची भरपाई आणि संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धविराम लागू करावा, अशी इराणची भूमिका आहे.