अमेरिकेत एक काळीज पिळवटणारी घटना घडली आहे. एका आईची चूक तिच्या बाळाच्या जीवावर बेतली आहे. बाळाच्या आईने त्या बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवले आणि झोपली. धक्कादायक म्हणजे त्यावेळी ओव्हन सुरु होता. त्यामुळे त्या बाळाचा मृत्यू झाला. पण ज्याप्रकारे ते बाळ होरपळले आणि त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या आईने त्याला चूकून ठेवले की जाणूनबुजून असे केले त्याचा पोलीस तपास करत आहेत.
ही घटना अमेरीकेतील कॅन्सस शहरात घडली असून मारिया थॉमस असे त्या महिलेचे नाव आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येथे राहणाऱ्या मारिया थॉमसवर तिच्या नवजात मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी कॅन्सस सिटी पोलिसांना मारिया नावाच्या महिलेच्या मुलाचा ओव्हनमध्ये जळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा महिलेने सांगितले की, रात्री मुलाला दूध पाजल्यानंतर तिने त्याला पाळण्यात झोपवले असे वाटले पण झोपेत तिने त्याला ओव्हनमध्ये कसे ठेवले हे माहित नाही.
सकाळी जेव्हा डोळे उघडले त्यावेळी तिच्या पायाखालची जमिन सरकली. तिने जसा ओव्हन खोलला बाळ होरपळले होते. ती तत्काळ बाळाला घेऊन रुग्णालयात धावली. मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात बाळाचा मृत्यू गुदमरुन आणि होरपळल्याने झाला आहे. पोलिसांनी मारियाला तू एवढी चूक कशी काय केलीस याबाबत विचारले असता ती म्हणाली, तिला खरंच माहिती नाही की तिच्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली ते.मात्र पोलिसांना मारियाच्या जबाबावर समाधान नव्हते. तिला कोर्टात उभे केले, त्यावेळीही तिने न्यायालयात हीच गोष्ट सांगितली. सध्या महिलेची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. तिचा मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा तपास केला जात आहे.
जॅक्सन काऊंटीमध्ये या महिलेविरुद्ध खटला लढणारे वकील जीन पीटर्स बेकर म्हणाले, ही एक मनाला भिडणारी घटना आहे. आईच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बाळाचा जीव गेल्याचे आम्हाला दु:ख आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे.