हिंदुस्थानवर लादलेल्या टॅरिफमुळे पुतिन चर्चेसाठी तयार झाले; डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

युक्रेन-रशिया युद्धाबाबत 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी नवा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदुस्थानवर लादलेल्या टॅरिफमुळे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन या चर्चेसाठी तयार झ्लाचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिका करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतो. हिंदुस्थानवर लादलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे पुतिन भेटीसाठी तयार झाले आहेत. रशिया हा एक मोठा तेल उत्पादक देश आहे आणि त्याची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ हिंदुस्थान आहे. जेव्हा तुम्ही तुमचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक गमावता आणि पहिला ग्राहक देखील गमावण्याची शक्यता असते. तेव्हा त्याचा निश्चितच परिणाम होतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्विकारल्यापासून अनेक युद्धे थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा गुरुवारी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार केला. आपण मध्यस्ती केली नसती तर अणुयुद्ध पेटण्याचा धोका होता, असेही ते म्हणाले. ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील बैठकीवर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. या भेटीमुळे युद्धबंदी होईल किंवा महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे.

बैठकीपुर्वी युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध तीव्र झाले आहे. रशियाने युक्रेनचा क्षेपणास्त्र कारखाना हवाई हल्ल्यात नष्ट केला आहे. त्यात जर्मनीच्या मदतीने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे बनवली जात होती. युक्रेनचा दावा आहे की रशियाने ड्रोनने अनेक शहरांना लक्ष्य केले आहे, ज्यामुळे नागरिक जखमी झाले आहेत. या तणावादरम्यान ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की जर रशियाने युद्धबंदीला सहमती दिली नाही तर त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील. ही बैठक युक्रेन-रशिया संघर्षात शांतता आणेल की तो आणखी वाढेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. मात्र, दोन्ही देशांमधील हवाई हल्ले शांतता चर्चेत अडथळा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागतिक शांततेसाठी पुढील 24 तास निर्णायक मानले जात आहेत. ही बैठक अयशस्वी झाली तर रशियाची क्षेपणास्त्रे युक्रेन तसेच युरोपमध्ये विनाश घडवू शकतात. तसेच महायुद्धाची शक्यता वाढेल. पुतिन यांनी युद्धबंदीसाठीच्या त्यांच्या अटी स्पष्ट केल्या आहेत. मात्र, युक्रेनने आपली जमीन कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा दावा केला आहे.

सुरुवातीला ट्रम्प यांनी जमीन देवाणघेवाणीचे संकेत दिले होते, परंतु युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या जमिनीचा एक इंचही न सोडण्याची घोषणा केली. युरोपियन युनियननेही युक्रेनच्या या भूमिकेला पाठिंबा दिला, त्यानंतर ट्रम्प यांना त्यांची भूमिका बदलावी लागली. आता ट्रम्प देखील युक्रेनच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की युक्रेनच्या भूमीवर फक्त युक्रेनचे अध्यक्षच वाटाघाटी करू शकतात. या परिस्थितीत पुतिन त्यांच्या अटींवर ठाम आहेत आणि युक्रेन देखील मागे हटण्यास तयार नाही. त्यामुळे या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले आहे.