अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांच्यासोबत स्नेहभोजन

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले. ट्रम्प यांनी पहिल्यांदाच व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना लंचसाठी बोलावले होते. हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणाव कायम असताना ट्रम्प-मुनीर यांच्यातील स्नेहभोजन ट्रम्प यांचे ‘लंच
पॉलिटिक्स’ मानले जात आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मी मुनीर यांना इथे बोलावले. कारण मला हिंदुस्थानचे युद्ध थांबवून ते संपवल्याबद्दल पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे आभार मानायचे होते, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी लंच मिटिंगनंतर प्रसारमाध्यमांना दिली.

ट्रम्प यांना शांततेचे नोबेल द्याः मुनीर

ट्रम्प यांनी हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संघर्षाबाबत केलेल्या दाव्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांनी ट्रम्प यांच्या सुरात सूर मिसळला. ट्रम्प यांचे भरभरून कौतुक करतानाच हिंदुस्थान-पाकिस्तानमधील अणुयुद्ध रोखल्याबद्दल ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी मुनीर यांनी केली.