
अमेरिकेच्या दबावापुढे हिंदुस्थान झुकला आणि त्यामुळे हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी कमी केली. हा अमेरिकेचा मोठा विजय असल्याचा दावा अमेरिकेचे अर्थ मंत्री स्कॉट बेसेंट यांनी केला. मोदी सरकारला त्याचे बक्षीस म्हणून ट्रम्प सरकार हिंदुस्थानवर लावलेले 50 टक्के टॅरिफ निम्म्यावर आणण्याचा विचार करू शकते, असे सांगत बेसेंट यांनी हिंदुस्थानला खिजवले आहे.
एका मुलाखतीत बेसेंट म्हणाले, हिंदुस्थानने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बरीच कमी केली आहे. हा अमेरिकेचा मोठा विजय आहे. हिंदुस्थानवर लावलेले 50 टक्के टॅरिफ प्रभावी ठरले. टॅरिफ अजूनही लागू आहे. मात्र ते कमी करण्याचा मार्ग निघाला आहे.
500 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव
हिंदुस्थानकडून रिफाईन्ड तेल खरेदी करून युरोप रशियाची एकप्रकारे मदत करत आहे. अशा देशांवर 500 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्याची गरज नाही. राष्ट्रीय आणीबाणीचा हवाला देत दुसऱ्या देशांवर ते कठोर आर्थिक निर्बंध किंवा टॅरिफ लावू शकतात, असे बेसेंट म्हणाले.




























































