
सामना ऑनलाईन। एल पासो/ओहिओ
टेक्सास आणि ओहिओ राज्यांत गेल्या 24 तासांत दोन हल्ले झाल्यामुळे अमेरिका हादरली आहे. दोन्ही घटनांमध्ये माथेफिरूंनी केलेल्या बेछूट गोळीबारात 30 जण ठार तर 42 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. टेक्सासमध्ये झालेल्या हल्ल्यात 20 तर ओहिओमध्ये झालेल्या हल्ल्यात माथेफिरूसह 10 जण ठार झाले.
टेक्सासमध्ये रविवारी माथेफिरूने केलेल्या गोळीबारात वॉटमार्ट स्टोअरमध्ये खरेदीसाठी आलेले 20 जण ठार तर 26 जण जखमी झाले. हल्लेखोराने एके-47 रायफलमधून अंदाधुंद गोळीबार करत स्टोअरच्या पार्किंग लॉटमध्ये रक्ताचा सडा घातला. दरम्यान, हा हल्ला वर्णद्वेषातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गेल्या आठवडय़ात कॅलिफोर्नियामध्येही वॉलमार्ट स्टोअरमध्ये खरेदीसाठी आलेल्यांवर माथेफिरूने गोळीबार केला होता. त्यानंतरचा हा दुसरा सामूहिक हत्याकांडाचा प्रकार घडला. एल पासो शहरातील ग्राहक मोठय़ा प्रमाणात खरेदीसाठी आले असताना काळे टी शर्ट, सैनिकांसारखी पॅण्ट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून एअर मफ लावलेल्या तरुणाने हल्ला केला. जो समोर आला किंवा त्याच्या टप्प्यात येणाऱया प्रत्येकाला तो टिपत होता. हल्ला झाला त्यावेळी स्टोअरमध्ये सुमारे हजार ते 3 हजार ग्राहक खरेदीसाठी आले होते.
हल्लेखोराचा हेतू काय?
पोलिसांनी पॅट्रिक क्रुसिअस या 21 वर्षांच्या तरुणाला संशयाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तो श्वेतवर्णीय (व्हाईट) आहे. त्याने आपला ‘अजेंडा’ ऑनलाईन केला होता. त्यानुसार ‘बाहेरच्या लोकांचे टेक्सासमधील आक्रमणाबद्दल’ त्याने लिहिले होते. त्याने इंटरनेटवर टाकलेली माहिती पाहता वर्णद्वेषातूनच हा हल्ला झाल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
भ्याड हल्ला – ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. ‘खूप वाईट झाले. या हल्ल्यात अनेक निरपराध मारले गेले. देशवासीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. वर्णद्वेषातून झालेल्या या हल्ल्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही.’
ओहिओत बारबाहेर हल्ला
ओहिओ राज्यातील डेटन शहरातील बारबाहेर उभ्या असलेल्या लोकांवर एका माथेफिरूने बेछूट केलेल्या गोळीबारात 9 जण ठार तर अनेक लोक जखमी झाले आहेत. यात माथेफिरूही ठार झाला. दुपारी एक वाजता ही घटना घडली. ई 5 रोडवरील फेड पेपर्स बारबाहेर ही घटना झाल्याचे समजते.


























































