12 हजार वर्षांपूर्वी देखील तंबाखू खायचा माणूस, अमेरिकेत सापडले पुरावे

पान, सिगरेट किंवा विडीत वापरला जाणारा एक जिन्नस म्हणजे तंबाखू. हा तंबाखू सेवनाव्यतिरिक्तही माणसाला अनेकवेळा उपयोगी पडला आहे. पण, याचा इतिहास हा तब्बल 12 हजार वर्षं जुना असल्याचा शोध नुकताच लागला आहे.

अमेरिकेच्या माया संस्कृतीत तंबाखूला प्रचंड महत्त्व होतं. तेव्हा याचा उपयोग उपचारांमध्ये होत होता. एखाद्याला एनिमा देण्यासाठी तंबाखू वापरला जाई. जगभरातही वेगवेगळे देश तंबाखूचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी करत असत. 18व्या शतकात इंग्लंडमध्ये पाण्यात बुडलेल्या बेशुद्ध व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याला तंबाखूचा धूर सेवन करण्यासाठी दिला जात असे.

नुकतंच, अमेरिकेच्या उत्तरेत असलेल्या उटा येथे काही पुराणवस्तू संशोधकांना 12 हजार वर्षांपूर्वीच्या तंबाखूच्या बिया सापडल्या आहेत. या बिया ग्रेट सॉल्ट लेक या वाळवंटात सापडल्या आहेत. हा आजवर मिळालेला सर्वात जुना तंबाखू आहे. कारण, यापूर्वी मिळालेला तंबाखू 3300 वर्षांपूर्वीचा असल्याचं निष्पन्न झालं आहे. अर्थात त्याकाळी मानव तंबाखूचा नेमका काय वापर करत असे, याचा उलगडा झालेला नाही.

कारण, या बिया अन्न शिजवण्याच्या भांड्यांतून मिळाल्या आहेत. या भांड्यात बदकं आणि जनावरांच्या हाडाचे तुकडे आहेत. कदाचित तंबाखूची पाने ज्वालाग्राही असल्याने चूल लवकर पेटण्यासाठी या पानांचा उपयोग केला जात असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या