
अमेरिकेने आपात्कालीन वापरासाठी कोवॅक्सीनला नकार दिला आहे. कोवॅक्सीन ही कोरोना प्रतिबंधक लस भारत बायोटेकने बनवली असून ही संपूर्ण देशी बनावटीची लस आहे. अमेरिकेने आपात्कालीन वापरास नकार दिल्याने हिंदुस्थानला झटका बसला आहे. हिंदुस्थानने जागतिक आरोग्य संघटनेकडे या लसीच्या मान्यतेसाठी अर्ज केला आहे. आता अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या लसीच्या वापरास नकार दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आरोग्य विभागाचे मुख्य सल्लागार डॉ, फाऊची यांनी कोवॅक्सीन प्रभावी असल्याचे म्हटले होते. हिंदुस्थानने नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेकडे कॉवॅक्सिनला मान्यता मिळण्यासाठीहीए अर्ज केला होता. परंतु अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला खीळ बसू शकते. भारत बायोटेकची अमेरिकेतील भागीदारी कंपनी ओक्युजेनने अमेरिकेत कोवॅक्सीनला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळवण्यासाठी विनंती केली होती.
कोवॅक्सिन लस म्हणून वापरण्या ऐवजी अँटी कोविड शॉटीसाठी वापरण्यात यावी अशी मागणी अमेरिकेकडे करू अशी माहिती ओक्युजेनने दिली आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने सुचवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ओक्युजेनने सांगितले. अमेरिकेने भारत बायोटेकला कोवॅक्सीनची अजून एक क्लिनिकल ट्रायल करण्याचे सांगितले आहे.
कोवॅक्सीनच्या मार्केटिंग ऍप्लिकेशन सबमिशनसाठी आणखी एक क्लिनिकल ट्रायल गरजेची असल्याचे ओक्युजेनने म्हटले आहे. अमेरिकेत कोवॅक्सीन आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे ओक्युजेनचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर शंकर मुसुनुरी यांनी सांगितले.
ओक्युजेन ही अमेरिकेची कंपनी असून ती बायोटेकसोबत कोवॅक्सीन निर्मितीचे काम करत आहे. ओक्युजेनला नुकतंच कॅनडामध्ये लस विकण्याचे विशेष हक्क मिळाले आहेत. चीनने दोन लस बनवल्या असून जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना मान्यताही दिली आहे. परंतु अमेरिकेने या लसींचा वापर करण्यास नकार दिला आहे. जर अमेरिकेने कोवॅक्सीनच्या वापरण्यास मंजूरी दिली तर हिंदुस्थानसाठी मोठा विजय ठरेल.

























































