साहित्य संघाच्या अध्यक्षपदी उषा तांबे विजयी, 35 नियामक मंडळ सदस्यांची मतमोजणी उशिरापर्यंत सुरू

गिरगावातील मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ऊर्जा पॅनेलच्या उषा तांबे अध्यक्षपदी विजयी झाल्या असून या पॅनेलचे सात पैकी पाच उमेदवार उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. ऊर्जा पॅनेलला मतदार सभासदांनी कौल दिल्याचे दिसून येत आहे. भाजप पुरस्कृत भालेराव विचार मंचला अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या लढतीत मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. अद्याप 35 नियामक मंडळ सदस्यांची मतमोजणी बाकी आहे. ही मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

साहित्य संघाच्या निवडणुकीत 17 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष व टपाली मतदान पार पडले. 1400 मतदारांपैकी 630 मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत ’ऊर्जा पॅनेल’च्या उषा तांबे यांना 334 तर ’भालेराव विचार मंच’चे किशोर रांगणेकर यांना 291 मते पडली. उपाध्यक्ष पदी ’ऊर्जा पॅनेल’चे विजय केंकरे, अशोक कोठावळे, अनिल बांदिवडेकर, सुदेश हिंगलासपूरकर आणि रेखा नार्वेकर हे विजयी झाले आहेत तर ‘भालेराव विचार मंच’चे जयराज साळगावकर आणि मधुकर वर्तक असे दोघे उपाध्यक्षपदी निवडून आले, असे समजतंय.

या दरम्यान 12 मतपत्रिका बाजूला काढण्यात आल्या आहेत. त्यावर काही ठिकाणी चुकीचे मतदान झाले आहे, तर एक – दोन मतपत्रिका या हयात नसलेल्या सभासदांच्या असल्याचे आढळून आले आहे. त्यांची पडताळणी सुरू आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी यशोधन दिवेकर यांनी दिली. मतदारांचा कल पाहता नियामक मंडळाच्या मतमोजणीत ‘ऊर्जा पॅनेल’ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

35 सदस्यांच्या नियामक मंडळातून 12 सदस्यांची कार्यकारिणी निवडली जाते. ही कार्यकारिणी संघाचा कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह निवडते. संघाच्या कारभारात कार्याध्यक्षांना सर्वाधिक अधिकार आहेत. गेली सात वर्षे उषा तांबे कार्याध्यक्ष होत्या.