
उत्तराखंड मधील हरिद्वार येथे एका व्यक्तीने (40) गरिबी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केली. पण त्याच्या मृतदेहावर एक दोन नव्हे तर चक्क सात महिलांनी तो माझाच नवरा असल्याचा दावा केला. यामुळे पोलिसही चक्रावले असून एका कर्जबाजारी व्यक्तीची खरी बायको कोण हे शोधण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर येऊन उभ ठाकलं आहे. पवन कुमार असे मृत व्यक्तीचे नाव असून तो ड्रायव्हर आहे.
रविवारी या व्यक्तीने विष प्राशन केलं. त्यानंतर त्याला गावातील काहीजण रुग्णालयात घेऊन आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शवविच्छेदन केल्यावर पोलिसांनी त्याचा मृतदेह घेऊन जाण्यास गावकऱ्यांना सांगितले. पण गावकऱ्यांऐवजी पाच महिलाच तो मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आल्या. त्या पाचही जणींमध्ये तो कोणाचा पती आहे यावरुन जुंपली. एका व्यक्तीच्या पाच पत्नी बघून पोलिसही चक्रावले. विशेष म्हणजे आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत. अथवा त्याची दुसरी पत्नीही आहे याबद्दल या सातही महिलांना काहीही माहित नव्हते. त्या पाच बायकांना शांत करण्याचा पोलीस प्रयत्न करत असतानाच अजून दोन बायका तेथे आल्या व तो माझा पती आहे असे सांगून इतर महिलांबरोबर वाद घालू लागल्या. यामुळे पोलिसांबरोबरच गावकरीही हैराण झाले. कदाचित मृत व्यक्तीच्या नावाने मोठी पॉलिसी असावी यामुळेच या महिला तो आपलाच पती असल्याचा दावा करत असाव्यात असे पोलिसांना वाटले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची माहिती मिळवली. तेव्हा त्यात शून्य बॅलन्स असल्याचे समोर आले. यामुळे संबंधित व्यक्तीने या सर्व महिलांची फसवणूक केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

























































