उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पावसाचा कहर; 48 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांत देशभरात पावसाचा कहर सुरूच असून त्याचा मोठा फटका उत्तर प्रदेश आणि बिहारला बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे 35 जणांचा बळी गेला आहे. देशभरात पावसामुळे आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांत देशातील विविध राज्यांना पावसाचा फटका बसला आहे. यात उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे घर पडणे, झाड पडणे आणि साप चावल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. घरांबरोबर भिंती कोसळूनही अनेकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत.

उत्तराखंड ते बिहारपर्यंत बरसतोय पाऊस

हिमालयातील तीर्थक्षेत्र हेमकुंड साहीबला जात असलेल्या 6 शीख भाविकांवर कडा कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचाही मृत्यू झाला. टिहरी जिल्हय़ात ही घटना घडली. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही पावसामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. जम्मू-कश्मीरमध्ये एकाचा मृत्यू झाला.

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरात पाणी

बिहारमध्ये गेल्या शुक्रवारपासून पाऊस बरसत असून राजधानी पटनामधील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बिहारमध्ये उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, रस्ते बांधकाममंत्री नंदकिशोर यादव आणि भाजपचे नेते व खासदार राजीवप्रसाद रुडी यांच्या घरात पाणी शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. बिहारमध्ये 3 ऑक्टोबरनंतर पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.