
उत्तर प्रदेशमधील मणिपुरी जिल्ह्यात दोन दलित अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. दोन तरुणांविरोधात तक्रार दाखल झाली असून एकाला अटक करण्यात आली आहे.
अत्याचार ग्रस्त मुली या एकमेकींच्या नातेवाईक आहेत. यातील एक मुलगी 17 वर्षांची असून ती नववीत शिकते तर तिची बहीण 16 वर्षांची आहे. या दोघी शुक्रवारी शेतात गेल्या होत्या.
तिथे गौरव शाक्य आणि सौरभ शाक्य या दोन तरुणांनी त्यांना पाहिलं. त्यांनी या दोघींचा पाठलाग केला आणि त्यांना पकडून जवळच्या दाट शेतात नेलं. तिथे सौरभने मोठ्या मुलीवर तर गौरवने धाकट्या मुलीवर बलात्कार केला.
पीडित मुलींना मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. तो जवळून जाणाऱ्या ग्रामस्थांच्या कानावर पडला. ते मदतीसाठी धावले. त्यांना जवळ येताना पाहून ते दोघे धावू लागले. ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांनी सौरभला पकडलं तर गौरव फरार झाला.
या प्रकरणी दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून गौरवचा शोध घेण्यात येत आहे. सौरभला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोन्ही मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून अद्याप अहवाल प्रलंबित आहे.




























































