मुलींना मोबाईल देऊ नका; त्या पळून जातात! उत्तर प्रदेश महिला आयोग सदस्यांचा अजब तर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात बलात्काराच्या घटना वाढत असताना राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीनाकुमारी यांनी अजब तर्क मांडत यासाठी मोबाईलला जबाबदार धरले आहे. मुली मोबाईलवर तासन्तास बोलत असतात आणि त्या मुलांसोबत पळून जातात. बलात्कारासारख्या घटना यातूनच घडत आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावरून देशभरात मीनाकुमारी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

अलिगड जिल्हय़ातील एका महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. याविषयी पत्रकारांशी बोलताना मीनाकुमारी यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांबद्दल भलतेच तर्क मांडले आहेत. मी सगळ्यांना सांगते की, मुली मोबाईलवर बोलत असतात. हे प्रकरण एवढे लांबपर्यंत जाते की, लग्न करण्यासाठी मुली मग पळून जातात. आपली मुलगी कुठे जाते? कोणासोबत बोलते? हे पालकांनी पाहायला हवे. मुलींचा मोबाईलही चेक केला पाहिजे. मुलींना मोबाईल देऊ नका. दिला तर लक्ष ठेवा. आईच्या निष्काळजीपणामुळेच मुली असे वागतात असे मीनाकुमारी यांनी म्हटले आहे.