उत्तर प्रदेश – मथुरेत 2 साधूंच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, एक गंभीर; भावाने केला हत्येचा आरोप

उत्तर प्रदेशातील मोठे तीर्थक्षेत्र असणाऱ्या मथुरेत दोन साधूंचा संशयास्पद मृत्यू झाला, तर एक साधू गंभीर आहे. यामुळे खळबळ उडाली असून बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. गंभीर प्रकृती असलेल्या साधूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साधूंचा आश्रम जंगलात असून याच आश्रमातील गायीच्या दुधाचा चहा या साधूंनी प्यायला होता. मात्र काही वेळातच दोन साधूंचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती बिघडली. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि एसएसपीसह पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेतली. याच आश्रमातील एका साधूने आपल्या भावांना विष दिल्याचा आरोप केला आहे.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, गोवर्धनमध्ये गिरीराज बागेच्या मागे बनवण्यात आलेल्या आश्रमात तीन साधू भजन-कीर्तन करायचे. शनिवारी सकाळी पोलिसांना या आश्रमातील दोन साधूंचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, मृत साधूंची नावे गोपाल दास आणि श्याम सुंदर दास अशी असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर गंभीर प्रकृती असणारे साधू रामबाबू दास यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

हत्येचा आरोप

दरम्यान, गोपाल दास यांचे बंधू टिकम यांनी खुनाचा आरोप केला आहे. आश्रमात देखील विषारी औषधांचा वास येत असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या