उत्तर प्रदेश- अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

rape
प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं सत्र सुरूच आहे. आता जालौन जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं वृत्त आहे. या घटनेतील आरोपीही अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, येथील उरई गावात राहणाऱ्या पीडितेच्या आईची तब्येत बुधवारी अचानक खराब झाली. पीडितेचे कुटुंबीय आजारी महिलेला घेऊन जिल्हा रुग्णालयात गेले. अकरावीत शिकणारी पीडीता रात्री आपल्या आईला बघण्यासाठी घरून रुग्णालयात जात होती. वाटेत अंधार असल्याने ती अर्ध्या वाटेतूनच घरी परतायला निघाली. तेव्हा तिला एकटीला पाहून आरोपी नराधमांनी तिचा पाठलाग केला आणि तिला पकडलं. तिला पकडून गर्द झाडीत नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

यानंतर तिला झालेल्या प्रकाराबद्दल कुणाला काहीही न सांगण्याबद्दल धमकीही दिली आणि तिथून पळून गेले. पीडिता घरी पोहोचली आणि दुसऱ्या दिवशी तिने ही घटना तिच्या आईला सांगितली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं असून अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या