
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 82 जणांचा मृत्यू, सरकार अजूनही आकडे लपवतेय, अशी टीका समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर केली आहे. त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सरकारला लक्ष्य केलं आहे. लखनऊ येथील समाजवादी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेच्या समस्या वाढत असल्याचा आरोप केला.
अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत की, “भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या असून, सामान्य कुटुंबांना आपल्या मुलींच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करणे कठीण झाले आहे.” ते म्हणाले की, बेरोजगारीमुळे तरुणांचे भविष्य अंधारात आहे आणि सरकारकडे यावर कोणताही ठोस उपाय नाही. विकसित भारताचा दावा करणारी ही सरकार जनतेच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असे ते म्हणाले.
अखिलेश यादव पुढे म्हणाले की, कुंभमेळ्यात 82 जणांचा मृत्यू झाल्याचे आकडे समोर आले आहेत. पण सरकार अजूनही आकडे लपवत आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृत्युंचे सत्य बाहेर आले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना रोख रक्कम दिली जात होती.




























































