
कोण कशाचा आनंद साजरा करेल याचा नेम नाही. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील एका कोचिंग इन्स्टिटय़ूटने यूटय़ूबवर पाच लाख सब्सक्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला. याचा आनंद साजरा करण्यासाठी सुपर क्लायमॅक्स अकादमीने महाभंडाऱयाचे आयोजन केले. या महाभंडाऱयासाठी पाच हजारांहून अधिक जण उपस्थित राहिले. जवळपास दीड किलोमीटरपर्यंत दूर रांग लागली. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोचिंग क्लासच्या बाऊन्सर्सना आणि कर्मचाऱयांना थेट हातात काठी घेऊन मैदानात उतरण्याची वेळ आली.
महाभंडारा ठेवण्यात आल्याची चर्चा वाऱयाप्रमाणे परिसरात पसरली. अवघ्या थोडय़ाच वेळात या ठिकाणी प्रचंड गर्दी जमली. महाभंडाऱयासाठी पाच हजारांहून अधिक जण आले होते. भंडाऱयात पुरी भाजी असल्याने अनेक जणांनी रांगा लावल्या. जास्त गर्दी झाल्याने जेवण संपले. पुन्हा जेवण बनवण्यात आले. भंडाऱयासाठी जास्त लोक पोहोचल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.



























































