
समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांचा मतदार संघ असलेल्या उत्तरप्रदेशमधील रामपूरमध्ये रामलीला सादर होत असलेल्या स्टेजवर सध्या बारबालांचे अश्लील डान्स सादर केले जात आहेत. या बारबालांवर पैसे उडविण्यात येत असून त्यांचा हा बाजार खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेथील प्रशासनावर व रामलीला आयोजकांवर टीका करण्यात येत आहेत.
रामपूरमध्ये सध्या दसऱ्याआधी रामलीलाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. या कार्यक्रमांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र रामलीला संपल्यानंतर रात्री त्याच स्टेजवर बारबालांच्या डान्सचा कार्यक्रम सुरू होतो. हा कार्यक्रम कधी कधी रात्री उशीरापर्यंत तर कधी पहाटेपर्यंत सुरू असतो अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. या कार्यक्रमात बारबाला तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत नाचतात असे सांगण्यात आले आहे. स्थानिकांनी या प्रकरणी संताप व्यक्त केल्यानंतर याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.

























































