चार नवऱ्यांची संपत्ती लुटून केले पाचवे लग्न, जमिनीच्या तुकड्यासाठी केली त्याची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

संपत्तीसाठी तिने चक्क एक दोन नव्हे तर तब्बल पाच लग्न केली… पाच नवऱ्यांपैकी चौघांना तिने लुबाडले, त्यांची संपत्ती चोरली. मात्र पाचवा काही तिच्या नावावर संपत्ती करायला तयार नव्हता. म्हणून अखेर तिने त्याला यमसदनी धाडले. त्या क्रूर महिलेने तिच्या पाचव्या नवऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. एखाद्या सिनेमातल्या कथानकाप्रमाणे या महिलेने हे गुन्हे केले आहेत. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील ललितपूर गावातील रहिवासी सूरज अहिरवार या व्यक्तीची 10 नोव्हेंबरला दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या हत्येने सगळीकडेच खळबळ माजली होती. यावेळी सूरज यांची पत्नी रामकुवर हिने आपल्या पहिल्या नवऱ्यावर हत्येचा आरोप केला होता. पण पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांच्यासमोर धक्कादायक वास्तव समोर आले. त्याच्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

लग्नाला वर्ष झाल्यानंतर आरोपी महिलेने सूरजकडे पहिल्या नवऱ्याच्या मुलाच्या नावावर जमीन करण्यासाठी तगादा लावला होता. पण सुरजने त्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्याच गोष्टीचा राग मनात ठेऊन तिने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. 10 नोव्हेंबर रोजी सुरज झोपेत असताना रामकुवरने त्याची दगडाने हत्या केली आणि दगड घराच्या जवळच लपवून ठेवला होता. एवढेच नाही तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपल्या पहिल्या पतीवर हत्येचा आरोप केला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात रामकुवरचा पहिला पती निर्दोष असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांची संशयाची सुई रामकुवरकडे वळली. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल केला. तसेच तिने त्यावेळी एकूण पाच लग्न करून पाचही नवऱ्यांना लुबाडल्याचे सांगितले. राम कुवर हिने गेल्या पंधरा वर्षात पाच लग्न केली असून त्यातील चार नवऱ्यांकडील दागदागिने व पैसे लुटून पोबारा केल्याचे तिने मान्य केले आहे.