
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 250 हून अधिक जागा मिळवत बहुमाताचा आकडा आरामात पार केला. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 25 मार्च रोजी होणार आहे. मात्र गेल्या 24 तासांमध्ये यूपीमध्ये तीन बड्या राजकीय व्यक्तींनी राजीनामा दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा तर अखिलेश यादव आणि आझम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी विधान परिषद सदस्यत्वाचा (एमएलसी) राजीनामा दिला. 2017 मध्ये निवडून आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी ते गोरखपूरचे खासदार होते. त्यामुळे त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता आणि 8 सप्टेंबर 2017 ला त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. मात्र यावेळी त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. येथे त्यांनी सपाच्या सुभावती शुक्ला यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. आता ते आमदार झाल्याने त्यांनी एमएलसी पदाचा राजीनामा दिला आहे.
सपाचे अध्यक्ष अखिलेख यादव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. करहल मतदारसंघातून ते निवडणूक लढले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एस.पी. बघेल यांचा पराभव केला. मात्र आझमगडची खासदारकी त्यांच्याकडे असल्याने एका सदनाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. लोकसभेमध्ये सपाच्या पाच जागा आहेत. त्यामुळे ते करहलचा राजीनामा देऊन लोकसभेत खासदार म्हणून काम करत राहतील असा अंदाज होता, मात्र त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तज्ज्ञांच्या मते अखिलेश यादव आतापासूनच 2027 च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
आझम खान यांचाही राजीनामा
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते रामपूरमधून लोकसभा खासदार होते. यंदा ते रामपूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी देखील लढले होते आणि निवडून आले. त्यामुळे आता त्यांनी आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळण्याचे ठरवले असून लोककसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश आणि आझम खान यांनी राजीनामा दिल्याने लोकसभेतील या दोन जागा खाली झाल्या आहेत. आता पुढील निवडणूक 2024 ला असल्याने या जागी पोटनिवडणूक कधी घ्यायची याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल.


























































