बीबीसीची प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध; उत्तराखंडमधील 13 वर्षांच्या रिद्धीमा पांडेचा समावेश

नुकत्याच जाहीर झालेल्या बीबीसीच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत उत्तराखंडमधील रिद्धीमा पांडे या 13 वर्षांच्या मुलीचा समावेश  करण्यात आला आहे. जगातील 100 प्रभावशाली आणि प्रेरणादायक महिलांच्या यादीमध्ये रिद्धीमाला स्थान मिळाले आहे. वयाच्या 13 व्या वर्षी या प्रतिष्ठीत यादीत स्थान मिळविणारी ती सर्वात कमी वयाची व्यक्ती आहे. पर्यावरण रक्षणासाठी तिने केलेल्या कामाची दखल घेत तिला या यादीत स्थान देण्यात आले आहे.

रिद्धीमा आई-वडीलांसोबत हरिद्वारमध्ये राहते. तिचे वडील दिनेश पांडे वन्यजीव कार्यकर्ते आहेत. तर आई विनिता राज्याच्या वन विभागात कार्यरत आहे. रिद्धीमा सध्या नववीत शिकत आहे. ‘पर्यावरण कायदा’ योग्य प्रकारे अंमलात आणण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्र सरकारविरोधात याचिका दाखल केल्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी रिद्धीमा चर्चेत आली होती.

2017 मध्ये तिने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जनाला मर्यादा घालण्यासाठी ‘कार्बन बजेट’ तयार करून राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन योजना तयार करण्याची मागणी तिने याचिकेत केली होती. सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्कस्थान या पाच देशांविरूद्ध 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेत याचिका दाखल करणार्‍या स्वीडिश कार्यकर्त्या ग्रेटा थुनबर्गसह 16 बाल याचिकाकर्त्यांमध्ये रिद्धीमाचा समावेश होता.

2013 मध्ये महापूरामुळे केदारनाथला झालेल्या दुर्घटनेचा आपल्यावर परिणाम झाला. त्यानंतर आपण पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचे रिद्धीमाने सांगितले. मानवाकडून निसर्गावर करण्यात येणाऱ्या आक्रमणामुळे होणाऱ्या दुर्घटना आणि त्यामुळे होणारी जीवीतहानी हा अक्षम्य गुन्हा असल्याचे तिने सांगितले. आपल्या चुका सुधारून अशा दुर्घटना टाळण्याची गरज आहे. निसर्गावर आक्रमण न करता पर्यावरणपूरक आणि पर्यावरण रक्षणाचा विचार करून आपण जीवनशैलीत बदल केले तर नैसर्गिक दुर्घटना कमी होतील, असेही तिने सांगितले. मानवाने निसर्गावर आक्रमण केलेल्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती कोसळल्याचे दिसून आले आहे, असेही ती म्हणाली.

पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी देशात फिरायचे आहे, असे तिने सांगितले. कोरोनाच्या महामारीमुळे हे वर्ष इतिहासातील संस्मरणीय वर्ष ठरणार आहे. कोरोना महामारीमुळे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा महत्त्वाचा धडा आपल्याला दिला आहे. आगामी काळात आपल्याला याचे भान ठेवावे लागणार आहे.  पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आपण देशभरातील शाळा- महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचेही रिद्धीमाने सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या