
उत्तराखंडमधील प्रसिद्ध गंगोत्री धाममध्ये बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री गंगोत्री मंदिर समितीने घेतला आहे. रविवारी झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, केवळ मुख्य मंदिरच नाही तर देवीचे हिवाळी निवासस्थान असलेल्या मुखबा क्षेत्रातही ही बंदी लागू असेल.
बद्रीनाथ-केदारनाथबाबतही हालचाली
गंगोत्रीनंतर आता बद्रीनाथ आणि केदारनाथ धामसह समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश नाकारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, आगामी बोर्ड बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हरिद्वार आणि ऋषिकेश ‘सनातन पवित्र शहरे’
केवळ मंदिरेच नव्हे, तर हरिद्वारमधील १०५ घाटांवरही बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. गंगा सभा आणि काही साधू-संतांनी केलेल्या मागणीनंतर सरकार यावर विचार करत असून, हरिद्वार आणि ऋषिकेशला ‘सनातन पवित्र शहरे’ म्हणून घोषित करण्याची योजना आहे.
राजकारण तापले
या निर्णयावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सावध प्रतिक्रिया दिली असून, सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते हरीश रावत यांनी यावर टीका केली असून, भाजपकडे निवडणुकीसाठी कोणतेही मुद्दे उरले नसल्याने अशा प्रकारचे अजेंडे राबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.























































