उत्तराखंडमधल्या गावात वाघामुळे कलम 144 लागू; शाळा, अंगणवाड्या देखील बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tiger

उत्तराखंड येथील कोटद्वारमध्ये एका वाघामुळे कलम 144 म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर गावातल्या शाळा, अंगणवाड्यांनाही पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तराखंडच्या कोटद्वारमधल्या रिखणीखाल आणि धुमाकोट या परिसरात एका नरभक्षक वाघाने थैमान घातलं आहे. आतापर्यंत त्याने दोन जणांना आपली शिकार बनवलं आहे. 13 आणि 15 एप्रिल रोजी वनविभाग आणि ग्रामस्थांना वाघाने अर्धवट खाऊन टाकलेले दोन मृतदेह सापडले होते. त्यामुळे आता वाघाची दहशत इतकी वाढली आहे की गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वाघाला पकडण्यासाठी पीआरडी जवान आणि पोलीसही या भागात तैनात करण्यात आले आहेत. सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत कुणीही ग्रामस्थाने गावात फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याखेरीज गावातील सगळ्या शाळा आणि अंगणवाड्या यांना पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने या संपूर्ण परिसरावर निगराणी ठेवली जात आहे. वाघाला पकडण्यासाठी जागोजागी पिंजरे ठेवण्यात आले आहेत.

वाघ पुन्हा हल्ला करण्याची दाट शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.