दिंडोशीत पालिका शाळेत लसीकरण केंद्र; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून रविवारी दिंडोशीत प्रभाग क्रमांक 41 मधील संतोषनगर येथील महापालिका शाळेत 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण केंद्र सुरू केले. शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर आणि आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या पाठपुराव्याने हे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यासाठी पालिका लसीकरणावर भर देत आहे. त्या पार्श्वभूमीवर, दिंडोशीत लसीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते झाले. पहिल्याच दिवशी सुमारे 100 जणांनी पूर्वनोंदणी करून लस घेतली. लसीकरणासाठी अॅपवर पूर्व नोंदणी करून लस घ्यावी तसेच कोरोनापासून बचावासाठी मास्क, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आमदार सुनील प्रभू यांनी केले. यावेळी मुंबईचे उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, विधानसभा संघटक प्रशांत कदम, महिला विधानसभा समन्वयक आशा केणी, उपविभागप्रमुख भाई परब, विधानसभा समन्वयक प्रशांत घोलप, महिला विधानसभा संघटिका विद्या गावडे तसेच पी-उत्तर विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. ऋतुजा बारस्कर, कार्यकारी अभियंता शिवकांत डोके, शाखाप्रमुख संपत मोर आदी उपस्थित होते.