
वडवणी तालुक्यातील उपळी शिवारात शेतातील विहिरीत 55 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना आज दुपारी एकच्या दरम्यान घडली आहे. वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीच्या बाहेर काढुन मृतदेहाचा पंचनामा केला असता मृतदेहाचे पाय दोरीच्या सहाय्याने बांधले असल्याचे आढळून आल्याने हत्या की आत्महत्या? अशी चर्चा परिसरात होत आहे. सदरील इसमाचा मृतदेह कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
उपळी येथील श्रीकिसन बापूराव परळकर (वय – 55) हे काल सकाळी 9 वाजता आपल्या पत्नीला शेतातून येतो असे सांगून गेले होते. रात्री घरी न आल्याने सर्वत्र शोधाशोध केली मात्र सापडले नाही. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये वडील हरवल्याची तक्रार मुलाने सकाळी नोंद केली होती. मात्र आज दुपारी एकच्या सुमारास उपळी शिवारातील स्वतःच्या शेतातील विहिरीत श्रीकृष्ण परळकर यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला.
विहिरीत मृतदेह असल्याची माहिती मिळताच वडवणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बाजाच्या सहाय्याने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला असता मृतदेहाचे पाय दोरीच्या साहाय्याने बांधले असल्याचे आढळून आल्याने हत्या की आत्महत्या? अशी चर्चा परिसरात होत आहे. सदरील मृतदेहाचा वडवणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कुप्पा येथील आरोग्य उपकेंद्र येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.



























































