मालगाडी बंद पडल्याने हार्बर ठप्प, प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मालगाडीने आज हार्बर मार्गावरील लोकलची वाट जवळपास तासभर अडवल्याचे समोर आले आहे. ट्रॉम्बे यार्डातून कुर्ला यार्डात जाणाऱया मालगाडीच्या इंजिनात दुपारी एकच्या सुमारास कुर्ला स्थानकानजीक बिघाड झाला. त्यामुळे संपूर्ण मालगाडीच हार्बर मार्गावर अडकल्याने अप-डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तासभराच्या या खोळंब्यामुळे हार्बर मार्गावरील जवळपास पंधराहून अधिक लोकल रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवासी लोकलमध्येच अडकून पडले होते.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असला तरी प्रवाशांना एक दिवस आधीच मनःस्ताप सहन करावा लागला आहे. ट्रॉम्बेहून आलेली मालगाडी हार्बर मार्गावर क्रॉसिंग करत असतानाच इंजिन बंद पडले. तासभर चाललेल्या या खोळंब्यामुळे पहिली शिफ्ट करून घरी निघालेल्या आणि दुसऱया शिफ्टसाठी जाणाऱया प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. जवळपास तासभर लोकल जागेवरच थांबलेल्या असतानाही रेल्वेकडून गाडीत कोणतीच उद्घोषण केली जात नव्हती. त्यामुळे अनेकांनी ट्रकमधून चालत पुढचे स्थानक गाठले. दोनच्या सुमारास मालगाडी हटवल्यानंतर लोकल वाहतूक सुरू झाली खरी, पण सायंकाळपर्यंत अनेक गाडय़ा विलंबाने धावत होत्या.

रेल्वेने कर्मचाऱयांच्या कामाची वेळ बदलली
लोकल ट्रेनमधील जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी आता मध्य रेल्वेनेच स्वतः पुढाकार घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सकाळची आपली कार्यालयीन वेळ 9.30 आणि 11.30 अशी केली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना सकाळची गर्दी टाळून प्रवास करता येणार आहे. रेल्वेची ही बदललेली कार्यालयीन वेळ 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.