
मागील दोन स्पर्धांमध्ये अपयशाला सामोरा गेलेल्या मराठमोळ्या वैभव जाधव याने मालाड येथे झालेल्या ‘ज्युनियर मुंबई श्री’ या मानाच्या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. या स्पर्धेला खेळाडूंचा आणि क्रीडाप्रेमींचाही दणदणीत प्रतिसाद लाभला. दिव्यांगाच्या मुंबई श्री स्पर्धेत परब फिटनेसच्या सुदिश शेट्टीने बाजी मारली तर फिटनेस फिजीक प्रकारात फॉरच्यून फिटनेसच्या अभिषेक पाडगावकरने ‘नवोदित मुंबई श्री’चा मान मिळविला.
स्पर्धा कोणतीही असो, त्याचे दिमाखदार आयोजन आणि सोबतीला एकापेक्षा एक खेळाडूंचा जोरदार खेळ दाखवणाऱया बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेतही जोरदार आणि नीटनेटक्या आयोजनाची झलक दाखवली. मालाड पूर्वेला जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विविध चार गटांत सहभागी झालेल्या दोनशेपेक्षा अधिक खेळाडूंनी सुखटणकर वाडीतील मैदान अक्षरशः फुलून गेले होते. 21 वर्षांखालील शरीरसौष्ठवपटूंच्या ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेला 96 खेळाडूंची उपस्थिती भुवया उंचावणारी ठरली. या वयात मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी कमावलेली पीळदार देहयष्टी पाहून उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
स्पर्धा ज्युनियर खेळाडूंची असली तरी स्पर्धक तयारीतले असल्यामुळे जेतेपदाची लढत जोरदार झाली. सहाही गटातले विजेते एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा जजेसला अव्वल खेळाडूची निवड करण्यासाठी 65, 70 आणि 75 किलो या गटातील खेळाडूंची कंपेरिझन करावी लागली. या दिमाखदार स्पर्धेचा सोहळा आमदार सुनील प्रभू, अतुल भातखळकर, उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे, जय भवानी व्यायाम मंदिराचे सुनील गोरड, अब्दुल मुकादम, विजय भोसले, शांताराम कदम यांच्या उपस्थितीत पार पडला.

























































