
सामना प्रतिनिधी । विरार
महाराष्ट्र एटीएसच्या अटकेत असलेला वैभव राऊत याला आज पुन्हा एकदा पोलिसांनी त्याच्या घरी आणले आहे. नालासोपाऱ्यातील भंडारआळीत राहणाऱ्या वैभवच्या घरात आठ गावठी बॉम्बसह गन पावडर व डिटोनेटर्सचा साठा जप्त केल्याचं सांगत त्याला गुरुवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पोलिसांनी त्याला घरी आणले असून चौकशी सुरू आहे.
वैभव राऊतच्या घरावर धाड टाकून त्याला अटक केल्यानंतर किमान १६ जणांची चौकशी करण्यात आली असून पुण्यातून अटक करण्यात आलेल्या सुधन्वा गोंधळेकर याच्याकडून आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती ‘एटीएस’ने दिली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र आज घरी आणल्यानंतर वैभवकडून आणखी कोणती माहिती पोलिसांना मिळाली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

































































