प्रासंगिक – वाचन हेच विकासाचे विद्यापीठ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैजनाथ महाजन

‘प्रसंगी अखंड वाचीत जावे। दिसामाजी काहीतरी लिहावे’ असे समर्थांनी सांगून ठेवलेलेच आहे. यातील दुसरा चरण ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हा काही सर्वांसाठी नाही. कारण लिहिणाऱया, लेखणीद्वारे अभिव्यक्त होणाऱया माणसांची संख्या प्रत्येक काळात अत्यंत सीमितच असल्याचे आपणांस वेळोवेळी दिसतच असते, पण साधी अक्षर ओळख झाली तरी इच्छाशक्ती असेल तर माणूस वाचन करू शकतो. असे असले तरी ‘वाचून काय मिळणार? शिकून काय होणार?’ असे भाबडे आणि प्रसंगी घातक प्रश्नसुद्धा विचारणारी माणसे प्रत्येक काळात असतातच. क्षणभर समजुतीसाठी आपण शिकून काय उपयोग? हा प्रश्न गृहीत धरला तरी शिकून काहीही उपयोग नाही असे ज्यांचे उत्तर असेल त्यांना शिकून काही उपयोग नाही हे समजण्यासाठीसुद्धा शिक्षणच घ्यावे लागते हे समजले पाहिजे. त्यातूनच ‘वाचन’ ही आपण आपली सर्वप्रथम गरज मानली पाहिजे असे वाटते. भारताचे पहिले अर्थमंत्री आणि मराठी मातीचे सुपुत्र चिंतामणराव देशमुख हे त्यावेळच्या मॅट्रिक्युलेट परीक्षेत पहिले आले होते. त्या वेळी त्यांच्या या यशावर लुब्ध होऊन राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांनी एक अप्रतिम अशी कविता केलेली होती. ती कविता श्रीयुत देशमुख यांनी वाचली आणि फक्त स्मितहास्य केले. आपला आत्मानंद एवढय़ा मर्यादित पद्धतीने व्यक्त करणाऱया देशमुखांचे वाचन भल्या भल्यांना स्तिमित करणारे असेच होते. मराठीतील एका नामवंत नियतकालिकाने त्यांच्या दिवाळी अंकाकरिता ‘आयुष्यात एवढे करायचे राहून गेले…’ अशी नामांकितांची लेखमाला सिद्ध केलेली होती. त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि सव्यसाची लेखक प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना अनेक वर्षे शोध घेऊन एक पुस्तक वाचायला मिळाले नाही, त्याची अत्यंत रेचक अशी कथा सांगितलेली होती. महात्मा गांधी यांनी ‘भगवद्गीता नसती तर मी वेडा झालो असतो’ अशा शब्दात भगवद्गीतेची महती अधोरेखित केलेली आहे. लोकमान्य डोंगरीच्या कारागृहात दीड महिन्याची साधी कैद सोसत असताना त्यांचे भाचे र. गो. विद्वांस यांच्याकडून किती ग्र्रंथ मागवत, कोणते ग्रंथ मागवत ते पण आता समोर आलेले आहे. त्यातून आपणांस या महापुरुषाच्या अफाट वाचनाची सहज कल्पना येऊ शकते. महाराष्ट्रातील थोर विचारवंत नरहर कुरुंदकर दिवसाकाठी सात ते आठ तास वाचन करीत असत असे त्यांचे सहकारी सांगतात. वाचनातून या थोर विचारवंताला जी तेजस्वी बुद्धिमत्ता लाभलेली होती ती त्यांनी रणजित देसाई यांच्या ‘श्रीमान योगी’ला लिहिलेल्या तितक्याच प्रगल्भ आणि बुद्धिवैभवाने समृद्ध अशा प्रस्तावनेतूनच समजून येते. ज्यांना ज्यांना अभिव्यक्त व्हावे असे वाटत असते त्यांनी प्रसंगी अखंड वाचत राहणे हे केव्हाही श्रेयस्कर असते. अलीकडेच एक पुस्तक आलेले आहे. पुस्तकाचे नावच मुळी ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ असे आहे. तेव्हा ‘दिसामाजी काहीतरी लिहिणे’ हे आपल्या हाती नसले तरी ‘प्रसंगी अखंड वाचीत जाणे’ मात्र निश्चितच आपल्या हाती असते.