मेंदीच्या पानावर…

110

मी वेगळी: वैशाली धोपावकर

मेंदीच्या पानावर

लहानपणापासून मला चित्रकलेची आवड होती, पण त्यात करीअर करण्याच्या दृष्टीने कधी पाहिले नाही. मी टेक्सस्टाईल डिझायनिंग करायचे. मेंदीचे वेड मला कधीच नव्हते. अजिबातच नव्हते. मला नीट कोन पकडताही यायचा नाही. माझी चित्रकला चांगली असल्याचे मैत्रिणीला माहीत होते. एकदा मैत्रीण बोलली मी मेंदीच्या ऑर्डर्स घेते तेव्हा माझ्यासोबत येत जा. तेव्हा एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे असा विचार करुन मी तिच्यासोबत दोनदा-तीनदा गेले आणि तेव्हापासून या कलेविषयी आवड वाढली. मला ते जमले. तेव्हा मला मेंदीविषयी जास्त कळत नव्हतं.

खरं तर मी मेंदी आयुष्यात कोणाला काढली नव्हती आणि दुसऱ्याच्या हातावर काढायलाही मला आवडत नव्हती. मैत्रिणीमुळे मला आवड निर्माण झाली. मग मी टेक्सस्टाईन डिझायनिंगची नोकरी करता करता मेंदीच्या ऑर्डर्स घेऊ लागले. मुलगी झाल्यानंतर मला नोकरी शक्य नव्हती. ती सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी माझ्यातली कला माझ्यासाठी उपयोगी आली. घर सांभाळून मी मेंदीच्या ऑर्डर्स घेऊ लागले. माझ्या वेळेनुसार मी मेंदी ऑर्डर्स घेऊ लागले आणि काही दिवसांतच मी पूर्णपणे मेंदी आर्टिस्ट झाले.

मग मला राजस्थान, दिल्ली, दुबई अशा विविध ठिकाणांहून ऑर्डर्स येऊ लागल्या. त्या निमित्ताने मी वेगवेगळी राज्ये, देश फिरु लागले. लोकांना माझी मेंदी आवडू लागली. अनेक कलाकारांच्या घरी जाऊनही मी मेंदी काढल्या आहेत. माझं ज्यांनी काम पाहिले त्यांच्याकडून मला आणखी कामं मिळत गेली. माझ्या मेंदीचा रंग चांगला येतो आणि डिझाईन वेगळ्या असतात. म्हणून ती लोकांना आवडते. मी कुठल्याही प्रकारचा कोर्स केला नाही. त्यामुळे मी माझे वेगळेपण आज मेंदी काढण्यात शोधतेय.

प्रत्येकीचं स्वतःचं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱयांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमचे वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या