ज्येष्ठ सिने संकलक वामन भोसले यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘राम लखन’, ‘अग्निपथ’, ‘कर्ज’ यासारख्या बॉलीवूडच्या 200 हून अधिक चित्रपटांचे एडिटिंग करणारे वामन भोसले यांचे आज सकाळी गोरेगाव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी, दिग्दर्शकांनी शोक व्यक्त केला आहे.

मूळचे गोव्याचे असलेले वामन भोसले 1952 साली मुंबईत आले. एडिटर डी. एन. पै यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये एडिटिंगचे धडे गिरवले. पुढे राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ या चित्रपटाद्वारे त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. ‘मेरा गाव मेरा देश’, ‘इंतेकाम’, ‘मौसम’, ‘आंधी’, ‘दोस्ती’, ‘कर्ज’, ‘गुलाम’, ‘हिरो’, ‘सौदागार’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे त्यांनी एडिटिंग केले. 1978 साली  ‘इन्कार’ या चित्रपटासाठी त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ने आणि 2019 मध्ये ‘राज कपूर जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना दिग्दर्शक मधुर भांडारकर म्हणाले, ‘मास्टर फिल्म एडिटर वामन भोसले यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. माझ्या करिअरच्या सुरुवातीला त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली.

उत्तम शिक्षक हरपला

तुमच्या आत्म्याला शांती लाभो वामन सर. माझा पहिला चित्रपट कालिचरणपासून ते खलनायकपर्यंत त्यांनी माझ्या चित्रपटांचे एडिटिंग केले. ताल या चित्रपटाला एडिट करण्यासाठी मला शिक्षकाप्रमाणे मार्गदर्शन केले. तुम्ही एक उत्तम शिक्षक होतात, असे ट्विट ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी केले आहे.