चार वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूरमध्ये आज जनआंदोलन उसळले आहे. गेल्या आठ तासापासून बदलापूरमध्ये रेल्वेमार्ग रोखण्यात आला आहे. एकीकडे मुलांवरील अत्याचाराविरोधात जनप्रक्षोभ उसळला असताना दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्याने महिला पत्रकाराशी बोलताना घाणेरडी भाषा वापरली आहे. ‘तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’, अशी अर्वाच्च भाषा शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी वापरली आहे. अशी भाषा वापरणे ही एकप्रकारची विकृतीच आहे.
वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्याच पक्षाचे नेते अशी भाषा वापरत असतील तर दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बातमीदाराचा हा एकप्रकारे विनयभंगच असून या विकृत प्रवृत्तीचा महिला आणि पत्रकारांनी जाहीर निषेध केला आहे.