
>> वंदना ताम्हाणे
आज सर्वांना हवी असणारी एकच गोष्ट म्हणजे मन:शांती. कुठे मिळणार ही? मनातच. पण मनाचा तळ गाठता येऊ शकतो का? तर हो, मनाच्या तळाशी पोहोचू शकतो. इथे जाण्यासाठी अध्यात्म नावाचा महासागर पोहून जावे लागेल. काय आहे अध्यात्म? अध्यात्म म्हणजे शिकणे. अध्यात्म या शब्दातच ‘आत्म’ हा शब्द. आपण दिवसभर खूप काही फक्त वाचतो, पाहतो, बोलतो, पण मनाशी संवाद करत नाही. मनाशी संवाद करणे म्हणजे शिकणे, पण आपण आपलाच दृष्टिकोन जो मनाला शिकवलाय तोच पाहतो. तो अहंकार. ते शिकणं नाही. जे मन आपल्याला शिकवते ते अध्यात्म नाही. म्हणून आपण काही शिकत नाही. कर्त्याच्या व आपण केलेल्या कर्माच्या अहंकारात अधिपत्याखाली जातो. आपलाच दृष्टिकोन जो आपल्याला हवाय. सोयीस्कर तोच घेतो.
आपण दुसऱयाचा दृष्टिकोनच समजून घेत नाही. सतत आपलेच सांगत राहतो. स्वत:लाच ओळखत नाही नीट. दुसऱयाला काय ओळखणार? दुसऱयाच्या जागेवर जाणे म्हणूनच तर पसायदान संत ज्ञानेश्वरांचे. या आत्मापर्यंत पोहोचणे म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे शिकणे इतका सरळ, साधा, सोपा अध्यात्माचा अर्थ आहे. शिक्षणाने माणूस संपूर्ण होतो, पण शिक्षणाला अध्यात्माची जोड मिळाली तर तो परिपूर्ण होतो. ‘परिपूर्ण’ हा शब्द गुरू-शिष्य परंपरेत अलौकिक अर्थाने वापरला जातो. ‘संपूर्ण’ हा शब्द शिक्षक विद्यार्थी परंपरेत लौकिक अर्थाने वापरला जातो. संपूर्ण ज्ञानाकडून परिपूर्ण ज्ञानाकडे केलेला प्रवास म्हणजेच वरवरच्या वैषयिक ज्ञानाकडून मनापर्यंतचा प्रवास मनाशी संवाद घडवून आणतो आणि तिथेच अध्यात्माचा जन्म होतो. अध्यात्म म्हणजे शिकणे म्हणजे समर्पण. संत ज्ञानेश्वरांनी किती सुंदर सांगितलेय याबाबत संवाद करताना…
हे शब्देविण संवादिजे। इंद्रिया नेणतां भोगिजे ।
बोलाआधी झोंबे। प्रमेयासि?
शब्दांविना मनातल्या मनात मनाशी संवाद इंद्रियांच्या नकळत शब्दांच्या अगोदर सिद्धांतापर्यंत पोहोचणे. शिकणेच नाही का? फक्त कानाने न ऐकता कानाचे मन करावे आणि या महासागरात अडथळा आणणारे दगड धोंडे दूर करून डुंबावे. शिकण्यासारख्या किती गोष्टी. शिकण्यातून आत्म्यापर्यंत पोहोचणे किती सहज सोपे.
या सहज शिकण्यातून आनंद मिळतो. कारण स्वत:पर्यंत पोहोचणे म्हणजेच अध्यात्मापर्यंत पोहोचणे. आपण आपल्या कोषात विचार करत असतो. विचार बदलत असतात, पण दृष्टिकोन बदलला की तो विचार स्थिर होतो. विचारांच्या गर्दीतला एक चांगला विचार स्वत:च्या किंवा एकाच्या जरी मनात रूजला तर तो विचार कायमचा जगला.
अमृताक्षराचा म्हणजे ज्याचा कधी क्षर होत नाही. जे कधीही मृत पावत नाही. जिवंत राहते. त्याचा शोध घ्यायला श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, गुरूचरित्र, संत तुकारामांची गाथा, एकनाथी भागवतासारखे श्रेष्ठ ग्रंथ मदत करतात. ही मनाच्या तळाशी नेणारी नावाडी मंडळी बरं का! मनाशी संवाद करायला शिकवणारे हे नावाडी जरूर आहेत, पण जीवनाची नाव आपली आपल्यालाच वल्हवायची आहे.




























































