‘वंदे भारत’ एक्सप्रेस मुंबईत दाखल, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गावर 130 कि.मी.वेगाने चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या कोटा येथून निघालेली सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ एक्सप्रेस अखेर आज मुंबईत दाखल झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर विना इंजिनाच्या सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनची दर ताशी 130 कि.मी.च्या वेगाने चाचणी घेण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर आय‌आरसीटीसीची पहिली प्रायव्हेट ट्रेन तेजस आठवड्यातून पाच दिवस चालविण्यात येते. तिची जागा आता ‘वंदे भारत’ एक्सप्रेस घेणार आहे. ही ट्रेन आज दुपारी मुंबई सेंट्रल येथे दाखल होणार झाली असून. या मार्गावर आरडीएस‌ओचे अधिकारी तिची 130 कि.मी. वेगाने चाचणी घेणार आहेत.

बुलेट ट्रेनची मिनी आवृत्ती समजली जाणारी अत्याधुनिक अशी मेट्रो किंवा लोकलप्रमाणे ड्रायव्हरचे केबिन असलेली लांबपल्ल्याच्या वंदेभारत ट्रेनला पुढे इंजिन जोडण्याची गरज लागत नाही. या गाडीला कोचमध्ये मोटर असून पेंटोग्राफवर ती मेट्रो प्रमाणे धावते. 2018 मध्ये पहिला ट्रेन सेट चेन्नईच्या आयसीएफने तयार केला होता. लखन‌ऊ ते वाराणसी अशी पहिली वंदे भारत 2019 मध्ये धावली होती. त्यानंतर वैष्णोदेवीला जाण्यासाठी दिल्ली ते काटरा दुसरी वंदे भारत सुरू झाली. आता मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर तिसरी वंदे भारत सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई ते दिल्ली स्लिपर कोचवाली वंदे भारत

सध्याच्या ‘वंदे भारत’ ट्रेन या चेअरकार स्वरूपाच्या आहेत. म्हणून त्या दिवसाच्या चालविण्यात येणार आहेत. जेव्हा स्लिपर कोचवाली वंदे भारत गाडी तयार करण्यात येईल त्यावेळी मुंबई ते दिल्ली मार्गावर वंदे भारत चालविण्यात येणार आहे. ताशी 160 कि.मी.च्या वेगाने धावण्याची क्षमता असलेली सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ ही ट्रेन देशभरातील 400 शहरांमध्ये चालविण्यात येणार आहे. ही ट्रेन सध्या वाराणसी ते दिल्ली, जम्मू ते काटरा या मार्गांवरच चालविण्यात येत असून ही गाडी आंतरराष्ट्रीय मानकांनूसार तयार करण्यात आली आहे. या ट्रेनच्या मेन्टेनन्सकरीता जोगेश्वरी येथे सुविधा उभारण्याचे काम सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

180 च्या वेगावर ‘कॉईन टेस्ट’

ही ट्रेन लक्झरीयस असून तिच्या आत बसणाऱ्या प्रवाशांना जरासुद्धा धक्के बसत नाहीत असे तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे. ट्रेनच्या डायनिंग टेबलवर पाण्याने भरलेला ग्लास ठेवून या ट्रेनच्या ‘शॉक ऑब्जव्ह’ची ताशी 180 च्या वेगावर ‘कॉईन टेस्ट’ घेण्यात आली होती, त्याचा व्हीडिओ नुकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला होता.