सर्वसामान्यांची वंदे साधारण मुंबईत! पहिली गाडी चाचणीसाठी वाडीबंदर यार्डात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘देशातील सेमी हायस्पीड ट्रेन’ वंदे भारतला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच रेल्वेने आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी वंदे साधारण ट्रेन तयार केली आहे. भगव्या आणि करडय़ा रंगातील ही देखणी गाडी चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून चाचणीसाठी बाहेर पडली असून ती मुंबईत मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्डात दाखल झाली आहे. पुश-पुलसाठी दोन इंजिन असलेल्या या गाडीला 22 डबे असून त्यामध्ये तब्बल 1800 प्रवाशांना या गाडीने आरामदायी प्रवास करता येणार आहे. तसेच गाडीचा ताशी वेग 130 किलोमीटर एवढी असणार आहे.

वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन देशाच्या विविध भागात धावत असली तरी त्याच्या तिकिटाचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याची दखल घेत रेल्वेने सर्वसामान्यांनाही खिशाला परवडणाऱया दरात आरामदायी वेगवान प्रवास करता यावा म्हणून वंदे साधारण ट्रेन तयार केली असून त्याच्या चाचण्या घेण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार प्रामुख्याने मुंबई-पुणे आणि कसारा-इगतपुरी या घाट मार्गावर चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शनिवारी रात्री ही गाडी वाडीबंदर यार्डात दाखल झाली असून आवश्यक तपासण्यानंतर ट्रायल घेतल्या जाणार आहेत.

कशी आहे गाडी

– गाडी वेगात चालवणे शक्य व्हावे म्हणून पुश-पुलसाठी मागे आणि पुढे वायुगतीशास्त्राrय आकाराच्या नाकाचे इंजिन.
– दोन्ही इंजिन कायमस्वरूपी गाडीलाच जोडलेली असणार.
– प्रत्येक डब्याची अंतर्गत रचना आकर्षक बनवली असून एलइडी लाईट्स, फॅन, स्वीच नव्या मॉडेलची आहेत.
– प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंट.
– डब्यात सामान्य प्रवाशांबरोबरच दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय.
– डबे कायमस्वरूपी कपलिंगच्या माध्यमातून जोडले असल्याने प्रवासादरम्यान धक्के जाणवणार नाहीत.

लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार

वंदे भारत गाडीत सीटिंग व्यवस्था आहे. त्यामुळे या गाडय़ा आठ-दहा तासांच्या प्रवास मार्गावर चालवल्या जात आहेत. मात्र वंदे साधारण गाडीत जनरल सेकंड क्लास कोचसह नॉन एसी स्लीपर कोच आहेत. त्यामुळे प्रवाशांना झोपून प्रवास करता येणार असल्याने सदर गाडी लांब पल्ल्याच्या म्हणजे पंधरा-वीस तासांच्या प्रवास मार्गावरही चालवणे शक्य होणार आहे.